गणेश सुळ
केडगाव : देलवडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आनंदी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आठवडे बाजाराचा अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थी विक्रेते व पालक, शिक्षक ग्राहक बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांनी विविध वस्तू, भाजीपाला, फळे व खाऊच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल केली. या आनंदी बाजाराचे उद्घाटन मा.सरपंच निलम काटे, मा. सरपंच दत्तात्रय शेलार, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ शेलार, राजाभाऊ काटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर शेलार, सागर निगडे, उद्योजक चैतन्य वाघोले, शंकर खेडेकर, नितीन शेलार, निलेश लव्हटे, श्रीकांत शेलार, विशाल गायकवाड, बापूराव अडागले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व गणित या संकल्पना या बाजारातून लक्षात याव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची छोटी दुकाने थाटली होती. विविध वस्तू घेण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शाळेने आयोजित केलेल्या या आनंदी बाजारात हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शेलार यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक पालकांनी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिक आणि विशेषतः महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील सर्व उपस्थितानी मुलांचे कौतुक केले. खाऊ गल्लीतील ओली भेळ, पाणीपुरी, वडापाव, इडली सांबर, इडली चटणी, लस्सी, सामोसे, बुंदी, गुलाबजाम, द्राक्षे, पेरू, बिस्किटे, चॉकलेट आणि विविध प्रकारचा भाजीपाला यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद सर्वांनी घेतला.