लोणी काळभोर, ता. 20 : विद्यार्थिनीच्या धाडसाला आणि संकटसमयी दाखवलेल्या संयमाला सलाम! मात्र, तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकून मृत्यूशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीच्या घटनेने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शैक्षणिक संकुलाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अक्षरशः पितळ उघडे पाडले आहे. एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या इमारतीतील लिफ्टमध्ये 14 तास अडकून पडावे लागते, पालक रात्रभर मुलीचा शोध घेतात, पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होते आणि दुसरीकडे संस्थेच्या सुरक्षा यंत्रणेला याची साधी माहितीही मिळत नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. विद्यापीठ प्रशासन नेमके झोपले होते का? की विद्यार्थिनीचा शोध घेण्याचा केवळ आव आणला जात होता? असे संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, बुधवारी (ता. 18) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास लिफ्टमध्ये अडकलेली 19 वर्षीय विद्यार्थिनी गुरुवारी (ता. 19) पहाटे सहाच्या सुमारास बाहेर आली. तब्बल 14 तास अंधारात, भीतीच्या सावटाखाली आणि मदतीच्या प्रतीक्षेत तिने प्रत्येक सेकंद संघर्ष केला. या काळात तिच्या कुटुंबीयांनी मात्र मुलगी बेपत्ता झाल्याच्या चिंतेने रात्र जागून काढली. सुदैवाने विद्यार्थिनी सुखरूप बाहेर आली, ही समाधानाची बाब असली, तरी या घटनेमुळे निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक प्रश्नांची उत्तरे एमआयटी प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील दोन मावस बहिणी एमआयटी शैक्षणिक संकुलात आयआयटीचे शिक्षण घेत आहेत. बुधवारी महाविद्यालय सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थिनी लिफ्टने खाली जात असताना वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट बंद पडली. विद्यार्थिनीने लिफ्टचा दरवाजा ठोठावला, आरडाओरडा केला तसेच पालकांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिचा आवाज बाहेर पोहोचला नाही. काही वेळाने तिचा मोबाईलही बंद झाला. दुसरीकडे पालकांनी मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला. अखेर मध्यरात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, ज्या संस्थेच्या आवारात विद्यार्थिनी शिक्षण घेत होती, त्याच संस्थेच्या इमारतीत ती तब्बल 14 तास अडकून पडली होती. हा विरोधाभास एमआयटीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

लिफ्टमध्ये आपत्कालीन यंत्रणा नव्हती की ती बंद होती?
लिफ्टमध्ये एखादी व्यक्ती अडकली, तर तिला तातडीने मदत मिळण्यासाठी आपत्कालीन अलार्म, इंटरकॉम किंवा आपत्कालीन फोन, बॅटरी बॅकअपसह प्रकाशव्यवस्था, ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस (ARD), योग्य वायुवीजन आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेला सूचना फलक अशा सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरक्षा कक्षातून लिफ्टमधील हालचालींवर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, एमआयटीच्या संबंधित लिफ्टमध्ये या सुविधा होत्या का? त्या कार्यरत होत्या का? विद्यार्थिनीने मदतीसाठी प्रयत्न करूनही सुरक्षा विभागाला याची माहिती का मिळाली नाही? लिफ्टची नियमित तपासणी आणि देखभाल केली जात होती का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जाहीर करणे आवश्यक आहे.
लाखोंची फी भरायची कशासाठी? पालकांचा संतप्त सवाल
नामांकित शैक्षणिक संस्थेचा दर्जा, आधुनिक इमारती आणि लाखो रुपयांची फी यांचा गाजावाजा केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुरक्षेची हमीच मिळत नसेल, तर अशा सुविधांचा उपयोग काय? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? एखाद्या विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असे सवाल पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे काही पालकांनी एमआयटी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शिक्षणाच्या माहेरघरातच विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणे, ही बाब शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून लिफ्टची देखभाल करणारी यंत्रणा, सुरक्षा विभाग आणि संबंधित जबाबदार अधिकारी यांची भूमिका तपासली पाहिजे. लिफ्टमधील आपत्कालीन यंत्रणांची तांत्रिक तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा. तसेच, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, 19 वर्षीय विद्यार्थिनी सुखरूप बाहेर आली म्हणून हे प्रकरण संपत नाही! आज ती बचावली; मात्र उद्या अशीच घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक भरत असलेल्या लाखो रुपयांच्या फीचा उपयोग नेमका कशासाठी होतो, याचे उत्तर एमआयटी प्रशासनाने द्यावे. या घटनेतील दोषींवर काय कारवाई होते आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







