मुंबई: सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने परदेशात निर्यात केल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मिळणाऱ्या ड्यूटी ड्रॉबॅक म्हणजेच शुल्क परताव्याचे दर कमी केले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम दागिन्यांची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर लगेच कमी होतील, असे निश्चितपणे सांगता येत नाही.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, सोन्याच्या दागिन्यांवरील शुल्क परतावा आता प्रति ग्रॅम 1,851.99 रुपयांऐवजी 1,794.11 रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक ग्रॅममागे निर्यातदारांना 57.88 रुपये कमी मिळतील. ही कपात सुमारे 3.1 टक्के आहे.

चांदीच्या दागिन्यांसाठी आणि काही संबंधित वस्तूंसाठीही परताव्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी प्रति किलोग्रॅम 29,501.09 रुपये मिळणारा परतावा आता 26,859.02 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे निर्यातदारांना प्रत्येक किलोग्रॅममागे 2,642.07 रुपये कमी मिळणार आहेत. ही कपात सुमारे 9 टक्के आहे.

परदेशात विक्रीसाठी वस्तू तयार करताना निर्यातदारांना काही शुल्कांचा खर्च करावा लागू शकतो. सरकारच्या ठरवलेल्या नियमांनुसार या खर्चातील काही रक्कम परत मिळण्याच्या व्यवस्थेला ड्यूटी ड्रॉबॅक म्हणतात. या परताव्यामुळे निर्यातदारांचा खर्च कमी होण्यास मदत होते. मात्र, परताव्याचे दर घटल्याने त्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होऊ शकतो.
या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी परतावा मिळेल. मात्र, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होईलच असे नाही. भारतातील सोन्या-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, रुपयाचा विनिमय दर, आयात शुल्क आणि स्थानिक मागणी यांसारख्या अनेक घटकांवर ठरतात. त्यामुळे केवळ या निर्णयाच्या आधारे सोने किंवा चांदी स्वस्त होईल, असा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही.






