बारामती: कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात बारामतीच्या एका (Crime News) दाम्पत्याशी संबंधित अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना घडली असून, वैवाहिक संशयातून (Baramati News) पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप पतीवर आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या या दाम्पत्याचा प्रवास रक्तरंजित शेवटी संपला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील अक्षय आणि शैला (वय 28) हे दाम्पत्य गाणगापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. मात्र बल्लुरगी गावाजवळ त्यांच्या कारमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की अक्षयने कार थांबवून पत्नीला बाहेर ओढले आणि रस्त्यावरच तिला बेदम मारहाण केली. सकाळी सुमारे 11 वाजता घडलेली ही घटना काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली.
व्हिडिओमध्ये शैला मदतीसाठी आर्त हाका मारताना दिसते, तर काही नागरिक तिच्या मदतीला धावत येतात आणि आरोपीला थांबवतात. काही काळ परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी वाटली. मात्र त्यानंतर घडलेली घटना अधिक भयावह होती.
मारहाणीमुळे जखमी झालेली शैला रस्त्याच्या कडेला कोसळली असताना अक्षयने कार मागे घेत वेगाने तिच्यावर चालवली. या क्रूर कृत्यात शैला गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडली. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही आरोपी घटनास्थळीच थांबून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कलबुर्गी पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अक्षयला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. विवाहाला 4 वर्षे झालेल्या या दाम्पत्याच्या नात्यातील तणाव इतक्या टोकाला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवदर्शनाच्या नावाखाली पत्नीला सोबत नेऊन हत्या केल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असण्याची शक्यता तपासात तपासली जात आहे.







