पुणे: पुण्यातील मांजरी बुद्रुक (Manjari Budruk News) परिसरातील एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणात (Pune Crime) न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी आलेल्या महिलेची पूर्वसंमती न घेता तिचे संपूर्ण गर्भाशय काढल्याच्या आरोपावरून चार डॉक्टरांसह 5 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित जोशी यांनी फेटाळला. (Latest Marathi News)

ही घटना 15 सप्टेंबर 2025 रोजी ‘साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये घडली होती. केशवनगर परिसरातील 35 वर्षीय महिला, जी ब्युटी पार्लर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तिने दिलेल्या तक्रारीनुसार 2023 मध्ये सोनोग्राफी दरम्यान तिच्या गर्भाशयात लहान गाठ असल्याचे निदान झाले होते. उपचारासाठी ती 13 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित रुग्णालयात दाखल झाली. मात्र, गाठ काढण्याऐवजी तिचे संपूर्ण गर्भाशय काढण्यात आले, असा आरोप आहे.
या प्रकरणात डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सुरज कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी बाजूने ॲड. विश्वास सातपुते यांनी युक्तिवाद करत हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे नमूद केले. संबंधित महिलेच्या संमतीशिवाय इतका मोठा शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे हा केवळ निष्काळजीपणा नसून संभाव्य गुन्हेगारी कृत्य असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
तसेच, काढलेल्या गर्भाशयाचे पुढे काय झाले, त्यामागे कोणता हेतू होता, याची चौकशी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा प्राथमिक अहवाल दिल्यामुळे न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला.
या घटनेमुळे रुग्णांच्या संमतीचा अधिकार आणि खाजगी रुग्णालयांमधील वैद्यकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपचारापूर्वी रुग्णाला संपूर्ण माहिती देणे आणि लेखी संमती घेणे ही मूलभूत जबाबदारी असताना अशा घटना घडणे चिंताजनक आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.







