पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव उपविभागीय कार्यालयातील (Junnar-Ambegaon News) लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना (Pune Crime) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. बांधकाम व्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याचा हा प्रकार आहे. (Latest Marathi News)

तक्रारदार हे एका भागीदारी फर्मचे भागीदार असून नारायणगाव परिसरात संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत इमारत उभारण्याचे काम सुरू होते. बांधकामाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. हा प्रस्ताव नगर रचना विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता.
20 मार्च 2026 रोजी तक्रारदार प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयात गेले असता, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या मागणीविरोधात तक्रारदाराने 24 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर पडताळणीदरम्यान अधिकाऱ्यांनी 2 लाख रुपयांवर तडजोड करून ती रक्कम स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
27 मार्च 2026 रोजी सापळा रचून एसीबीने मंचर येथील कार्यालयात कारवाई केली आणि दुपारी 3:03 वाजता तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताना गोविंद शिंदे यांना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे महसूल विभागातील कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सध्या या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. सरकारी परवानग्या आणि प्रमाणपत्रांसाठी लाच मागण्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याने पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.







