पुणे: पिंपरी-चिंचवड शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी गुन्हे शाखेने आपली कंबर कसली आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली. दरम्यान, अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी हा कोणताही सराईत तरुण गुन्हेगार नसून 68 वर्षांचा एक वृद्ध असल्याचे समोर आले आहे.
चिंचवड रेल्वे स्टेशनच्या गजबजलेल्या परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या जवाहर अर्जुनदास रामनानी (वय 68, रा. पिंपरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चक्क 6 किलो 55 ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल असा एकूण 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.

तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी वयस्कर व्यक्तींचा ‘कॅरिअर’ म्हणून वापर केला जात आहे. रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी इतक्या सहजपणे अमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न होणे, ही चिंतेची बाब आहे. हवालदार विशाल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.







