crime : पुण्यासारख्या शिक्षणनगरीत हृदयद्रावक घटना घडली. अभियांत्रिकी शिक्षणासाठी आलेल्या 21 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे 7:30 वाजता घडली. तिसऱ्या वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकणाऱ्या या तरुणीने राहत्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत टोकाचा निर्णय घेतला.

मृत विद्यार्थिनीचे नाव सिमरन दांडगे (वय 21, मूळ रहिवासी परभणी) असे आहे. ती शिक्षणासाठी पुण्यात येऊन वाल्हेकरवाडीतील एका खासगी वसतिगृहात राहत होती. सकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील लोक धावत आले. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांना तिच्या खोलीत एक लहानशी चिठ्ठी आढळली. त्यात केवळ “सॉरी” एवढाच उल्लेख होता. या एका शब्दाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत नेमकं कारण काय? कोणता ताण होता? की काही वैयक्तिक अडचण? सध्या या सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास दत्तात्रेय चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शैक्षणिक ताण, वैयक्तिक नातेसंबंध किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित कारणांचा शोध घेतला जात आहे. तिचे कुटुंबीय परभणीत असल्याने त्यांच्याकडूनही माहिती घेतली जात आहे.







