पुणे, ता. 27 : मंचरचे तालुका जुन्नर येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना (Pune Crime) लाचेच्या प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे महसूल अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणामुळे महसूल विभागातील लाचखोरीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. (Marathi Breaking News)

उपजिल्हाधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील 15 महसूल अधिका-यांना शासनाने नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यातच उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे एसीबीच्या सापळ्यात सापडल्याने पुण्यातील महसूल विभागात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव विभागात महसूल खात्यातील भ्रष्टाचारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडले आहे. एका बांधकामाच्या पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना त्यांच्यासह एका लिपिकालाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई एका तक्रारीवर आधारित होती. तक्रारदाराने इमारतीचा ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ मिळवण्यासाठी अर्ज केला असता, त्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. पडताळणीत हे सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने मंचर येथील कार्यालयात सापळा रचला आणि व्यवहाराच्या वेळी दोघांना पकडले.
या घटनेमुळे महसूल विभागातील कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बांधकाम परवानग्या, प्रमाणपत्रे किंवा जमीनसंबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना अनेकदा विलंब आणि लाचेच्या मागण्या सहन कराव्या लागतात.







