लोणी काळभोर, ता. 27 : हवेली तालुक्यातील मांजरी रोडवरील कदमवस्ती परिसरातील लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून तब्बल 4 लाख 29 हजार 280 रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मोठ्या व्यावसायिक आस्थापनांमधील वीजचोरीवरही आता कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महावितरणच्या भरारी पथकाच्या उपकार्यकारी अभियंता दिप्ती अनिल पाटील या सप्टेंबर 2024 पासून मुळशी विभागात कार्यरत असून वीजचोरी प्रकरणांवर कारवाई करणे त्यांच्या जबाबदारीत येते. 13 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसह लक्ष्मी हॉस्पिटलच्या वीजजोडणीची तपासणी केली असता मोठा गैरप्रकार समोर आला.
तपासणीदरम्यान हॉस्पिटल व त्याच इमारतीतील घरगुती वीजजोडणीसाठी असलेले मीटर तपासले असता, एलटी पोलवरून येणारी सर्व्हिस वायर मीटरला न जोडता थेट डीपी स्विचला जोडून वीज वापर सुरू असल्याचे आढळले. हा प्रकार सरळसरळ वीजचोरीत मोडत आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलसाठी मागील 44 महिन्यांपासून 21 हजार 392 युनिट वीज अनधिकृतरीत्या वापरली गेली असून त्यामुळे महावितरणला 3 लाख 29 हजार 580 रुपयांचे नुकसान झाले आहे. तपासणीवेळी 3 .45 किलोवॅट इतका जोडभार आढळून आला.
याचप्रमाणे घरगुती मीटरसाठीही डीपी स्विचद्वारे वीज वापर केल्याचे निदर्शनास आले. मागील 35 महिन्यांत 5 हजार 188 युनिट वीज अनधिकृतरीत्या वापरल्याने महावितरणचे 99 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नोंदविण्यात आले आहे. वीजचोरीसाठी वापरलेले वायर, डीपी स्विच आणि इतर साहित्य पंचांसमक्ष जप्त करून सील करण्यात आले.
4.29 लाखांची थकबाकी अद्याप न भरल्याने गुन्हा
हॉस्पिटल व घरगुती अशा दोन्ही मीटरच्या वीजचोरी व तडजोड रकमेचा एकूण आकडा 4 लाख 29 हजार 280 रुपये इतका असून, ही रक्कम अद्याप न भरल्याने संबंधित अबोली जयसिंग कदम व जयसिंग बबन कदम यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अंतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







