राहुलकुमार अवचट
यवत : पारगाव येथे वाहतुकीस अडथळा ठरतील अशा प्रकारे वाहने उभी केल्याने अपघात होऊन, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता. या बेशिस्तीबद्दल चार जणांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिरूर-चौफुला या मार्गावर असलेल्या पारगाव गावातील मुख्य चौकात दुपारी साडेतीन ते साडेचार दरम्यान अनिल बबन वनशिव (वय ४०), केशव नामदेव कदम (वय २५), ज्ञानेश्वर अंकुश बोत्रे (वय ३५) व किसन नामदेव ताकवणे (वय ६०, चौघेही रा. पारगांव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना अडथळा निर्माण केला.
या प्रकारामुळे अपघात होऊन, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता. या प्रकरणी पोलीस नाईक दत्तात्रय सुभाष काळे यांच्या फिर्यादीवरून अनिल बबन वनशिव, केशव नामदेव कदम, ज्ञानेश्वर अंकुश बोत्रे, किसन नामदेव ताकवणे या चौघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवकर व पोलीस हवालदार जगताप हे करीत आहेत.