उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाने घराच्या शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोळेवस्ती येथे रविवारी (ता. 05) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
शंकर जयदेव ढावारे (वय- २५, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शंकर व त्याचे वडील उरुळी कांचन हद्दीतील गोळेवस्ती येथे राहतात. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने शंकर याने आत्महत्या केल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. दरम्यान, त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाली घेऊन उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शंकर याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांना खबर देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.