उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील टीव्हीएस दुचाकी शोरूममध्ये काम करणारा 25 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना उरुळी कांचन येथे शनिवारी (ता. 10) घडली. शुभम श्रीराम अंकुशे (वय -25) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शुभमची आई रत्ना दिंगबर दुधवडे (वय 39, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रत्ना दुधवडे नर्स म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा शुभम हा गेल्या तीन वर्षांपासून उरुळी कांचन येथील मिलिंद रमेश म्हेत्रे यांच्या टीव्हीएस शोरूममध्ये काम करत होता. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी चारच्या सुमारास शुभमने आईला फोन करून शोरूममधील कामाच्या कारणावरून मालकाने आपल्याला चापट मारल्याचे सांगितले. त्यानंतर आईने अभिनव वसंत वड्ड यांना शोरूममध्ये पाठवले. तेथे शुभमशी बोलल्यानंतर अभिनव हे साडेचारच्या सुमारास आपल्या कामावर निघून गेले. त्यांनी शुभमला घरी जाण्यास सांगितले होते.

दरम्यान, ड्युटी संपल्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास रत्ना दुधवडे यांनी शोरूममध्ये जाऊन मालकाची भेट घेतली आणि मुलासोबत नेमका काय वाद झाला, याची चौकशी केली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्या घरी परतल्या. मात्र, शुभम घरी आलेला नव्हता. त्यांनी त्याला वारंवार फोन केला; परंतु त्याने फोन उचलला नाही. यानंतर आईने उरुळी कांचन, भवरापूर आणि शिंदवणे परिसरासह नातेवाइकांकडे शुभमचा शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शुभम अंकुशे याची उंची अंदाजे पाच फूट चार इंच असून, वर्ण गोरा आणि केस काळे आहेत. त्याने ग्रे रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाची चप्पल घातली होती. त्याच्याकडे एअरटेल सिमकार्ड असलेला व्हिवो कंपनीचा मोबाइल फोन आहे. या तरुणाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







