पुणे : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने ६०० हून अधिक विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. चार ते सात नोव्हेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवड, स्वारगेट आणि शिवाजीनगर येथून या बस धावणार आहेत. नियमित बसचे आरक्षण आतापासूनच पूर्ण होऊ लागल्याने विशेष बसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राहणारे अनेक नागरिक दिवाळीसाठी आपल्या गावी जातात. या काळात मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वेगाड्यांचे आरक्षणही पूर्ण झाल्याने एसटी बसवरील प्रवाशांचा भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित बससेवेसोबत अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट बसस्थानकातून २०० अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या बसचा लाभ घेता येईल. शिवाजीनगर बसस्थानकातूनही विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्थानकांवर आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे.

यापूर्वी मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातून अतिरिक्त बस सोडण्यात येत होत्या. मात्र, तेथील जागा सोयीची नसल्याने यंदा पिंपरी-चिंचवड आगारातून बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बस उभ्या करण्यासाठी जवळचे मैदान भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून, चार ते सात नोव्हेंबरदरम्यान येथून ४०० हून अधिक विशेष बस धावणार आहेत.
दरम्यान, पुणे विभागातून विदर्भासाठी ४०, मराठवाड्यासाठी ३५ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी १० अशा ८५ हून अधिक नियमित बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. विशेष बसचे ऑनलाइन आरक्षण येत्या दोन दिवसांत सुरू होणार असून, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून, मोबाईल ॲपद्वारे किंवा अधिकृत आरक्षण केंद्रांवरून तिकीट काढता येणार आहे. नियमित बससेवाही सुरू राहणार असल्याने दिवाळीच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.






