पुणे : पैसे परत देण्याच्या वादात मध्यस्थी करताना आई आणि पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा गैरसमज झाल्याने तिघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सुतारवाडी परिसरात घडली. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आयटीआय मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. पाषाण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ कृष्णा रामप्रकाश शर्मा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव हा शेअर मार्केटिंगचे काम करतो. ज्ञानेश्वर भोईन याने एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये घेतले होते. मात्र, ही रक्कम परत केली जात नसल्याने त्यांच्यात वाद सुरू होता. या प्रकरणात सहदेव मध्यस्थी करत होता.

दरम्यान, सहदेवने संबंधित व्यक्तीच्या आई आणि पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा गैरसमज झाल्याने त्याला धमकी देण्यात आली होती. रविवारी रात्री सहदेव आणि त्याचा मित्र ओंकार डोईफोडे हे पाषाण येथील साई चौक परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी सहदेवला सुतारवाडी येथील आयटीआय मैदानाच्या प्रवेशद्वाराबाहेर चर्चेसाठी बोलावले.

तेथे आई आणि पत्नीविषयी अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यानंतर तिघांनी सहदेवला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सहदेवने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने कमरेला लावलेला कोयता काढून त्याच्या छातीवर, डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार केले. या हल्ल्यात त्याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाणेर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







