पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या या दोन्ही मार्गांचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वाहतूक अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. तसेच या मार्गांमुळे परिसरातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची हडपसर ते वाखरी अशी एकूण लांबी २३४ किलोमीटर आहे. त्यापैकी २२५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे काम सहा टप्प्यांत करण्यात येत आहे. दिवेघाट ते लोणंद, धर्मपुरी ते खुडुस, खुडुस ते वाखरी आणि वाखरी ते मोहोळ या चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. हडपसर ते दिवेघाट या टप्प्यातील सुमारे सहा किलोमीटर आणि लोणंद ते धर्मपुरी या टप्प्यातील सुमारे एक किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. या मार्गासाठी सुमारे तीन हजार १५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाटस ते तोंडले अशी एकूण लांबी १३० किलोमीटर आहे. त्यापैकी १२३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पासाठी एक हजार ८२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचे काम पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा तीन टप्प्यांत सुरू आहे. पाटस ते बारामती हा टप्पा पूर्ण झाला आहे. बारामती ते इंदापूरदरम्यान सुमारे सहा किलोमीटर, तर इंदापूर ते तोंडलेदरम्यान सुमारे एक किलोमीटरचे काम बाकी आहे.

या दोन्ही मार्गांमुळे पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. तसेच या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था सुधारल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अभिजित औटे यांनी दिली.






