उरुळी कांचन, (पुणे) : शेतातील अनावश्यक गवत पेटविल्याने शेजारी असलेल्या डाळिंब बागेची २५ झाडेही गवताबरोबर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच ही घटना घडली आहे. या घटनेत तब्बल सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्याने खबर दिली आहे. नंदू शिवाजी टिळेकर (वय – ४५, रा. टिळेकर मळा, बायफ रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत टिळेकर यांची शेती आहे. या शेतीत मागील आठ वर्षापासून डाळिंब हे पिक घेतात. डाळींब बागेची छाटणी करून निघालेल्या झाडाच्या फांदया या बागेशेजारी असणाऱ्या बांधावर टाकल्या होत्या. टिळेकर यांच्या शेतीच्या शेजारी गणेश विष्णु बगाडे (रा. बगाडेवस्ती, उरुळी कांचन) यांची शेतजमीन आहे. त्यांचा शेतात योगेश सुरेश टिळेकर रा. टिळेकरवाडी ता. हवेली) हा कामगार शेती करत आहे.
नंदू टिळेकर हे रविवारी (ता. ०७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील डाळींबीच्या बागेतील झाडांना आलेली फुट काढत होते. त्यावेळी शेजारी असणारे मोकळया शेतातील वाळलेले गवत योगेश टिळेकर हे जाळत होते. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास टिळेकर घरी गेले. त्यावेळी बांधावरील टाकलेल्या सर्व झाडाच्या फांदया जळाल्या. त्यामुळे डाळींबाच्या झाडांना आग लागली. यामध्ये जवळजवळ डाळिंबाची २५ झाडे जळाली. योगेश टिळेकर याने त्याचे मालक गणेश बगाडे यांच्या शेतातील गवत जाळल्यामुळे बांधावर टाकलेल्या डाळींबाच्या फांदयांना आग लागुन शेतातील झाडे जळाल्याचा संशय नंदू टिळेकर यांना आहे.
दरम्यान, या आगीत नंदू टिळेकर यांचे तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी पंचनामा केला आहे. तर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला असून उरुळी कांचन पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. नुकसानग्रस्त शेतकरी नंदू टिळेकर यांनी नुकसान भरपाईची मागणी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना केली आहे. यावर उरुळी कांचन पोलीस काय करवाई करणार याकडे टिळेकरवाडीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
उरुळी कांचन पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
नंदू टिळेकर यांनी आठ वर्षापूर्वी डाळिंबाची बाग लावली होती. त्यावेळीही अज्ञात व्यक्तींनी नंदकुमार टिळेकर यांच्या शेतीमधील तब्बल ३०० डाळिंबाची रोपे रात्रीच्या वेळेस उपटून टाकून मोठे नुकसान केले होते. शेतकरी टिळेकर यांच्या शेतातील बागेचे वारंवार नुकसान करणाऱ्यावर उरुळी कांचन पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.