खडकवासला (पुणे) : पुणे शहरात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपासून पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन–तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी (ता. 24) सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2140 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. तसेच सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.