पुणे: पुण्यातील भिडे पुलाजवळ एका 17 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत शौर्य मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. शौर्य आणि काही तरुण या परिसरात एकत्र उभे होते. सुरुवातीला त्यांच्यात बोलणे सुरू होते. मात्र, काही वेळातच जुन्या वादावरून त्यांच्यात वाद वाढला. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने शौर्यला नदीपात्राजवळ अडवून मारहाण केली. याचदरम्यान एका तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी झाला.
शौर्यच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील 2 ते 3 दिवसांपासून काही तरुण शौर्यला भेटण्यासाठी बोलावत होते. मात्र, वाद पुन्हा वाढू नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये, या भीतीने तो त्यांना भेटायला गेला नव्हता. तरीही गुरुवारी रात्री त्याला गाठून हल्ला करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे.








