गणेश सुळ
केडगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळून ती परंपरा आजतागत जपलेली आहे. ‘सोंगाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील देलवडी गावची ओळख आहे. येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा अखंडितपणे आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे.
वैशाख महिन्याच्या सुरुवातीलाच गावातील बारा बलुतेदार, कलाकार मंडळी हा सोंगाचा कार्यक्रम सादर करतात. आकर्षक स्वरूपात शोभेचे दारुकाम, फटाक्यांची आतषबाजी करत सायंकाळी आठ वाजता रासाई देवीची मानाची काठी चावडीवर नाचविली गेली. त्यानतंर दहा वाजता गावातील बारा बलुतेदार कलाकार मंडळींच्या ऐतिहासिक व पारंपरिक सोंगाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
या पारंपरिक कार्यक्रमात गावातील सुतार फळी याच्याकडून सर्वप्रथम, त्यानंतर कुंभार फळी याच्याकडून सोंग सोडण्यात आले. यामध्ये गणगौळण, झाडू, सरस्वती, विदूषक जाडू का बेटा, सारजा, फारस, दैत्य भवानी (बरोबर मध्यरात्री), पाच पांडव, गणपती, मारुती, काळभैरव, मार्तंड्य, मच्छ, सिद्धी, अर्धनारी, रामलक्ष्मण सीता, बाळंतीण, पोतराज, भिल्ल अशा विविध पारंपारीक वेशभूषा परिधान करून रात्रभर सोंगाचा कार्यक्रम पार पडला . दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गावकारभारी मंडळींचा मुजरा घेऊन सोंगांचा कार्यक्रम संप्पन्न झाला.
सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना नवसंजीवनी मिळत असते. सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजेच अगदी पूर्वजांपासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा अखंडित पणे आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे.
रज्जाक शेख -ज्येष्ठ कलाकार (खेळगडी)