अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : नागरिकांना कोठेही अडचणीत मदत हवी असल्यास शासनाच्या वतीने नव्याने ११२ हा क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. परंतु या क्रमांकावर वारंवार फोन करुन पोलिसांना त्रास देण्याच्या हेतूने खोटी माहिती देऊन जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब काशिनाथ साकोरे (महादेववाडी केंदूर ता. शिरुर जि. पुणे) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रतिक जगताप हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना पोलीस हेल्पलाईन नंबर ११२ वर केंदूर येथून एका मोबाईल नंबरहून खून झाल्याबाबत फोन आला. त्यामुळे पोलीस तातडीने सदर ठिकाणी गेले मात्र तसा कोणताही प्रकार झालेला नव्हता, त्यांनतर पुन्हा शिक्रापूर परिसरात मला दोन इसमांनी मारहाण केल्याबाबतचा फोन आला असा कॉल आला. पोलीस सदर ठिकाणी गेले परंतु असला काही प्रकार घडलेला नव्हता. तेव्हा दोन्ही ठिकाणी खोटी माहिती देऊन डायल ११२ चा गैरवापर करणारा व्यक्ती एकच असल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी सदर इसमाला समज दिली, मात्र त्यांनतर देखील काही वेळाने पुन्हा ११२ वर फोन आला. तेथे देखील तोच इसम असल्याचे पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांच्या निदर्शनास आले. बाळासाहेब साकोरे हा मुद्दाम पोलिसांना त्रास देण्याचे हेतूने पोलीस स्टेशन तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे फोन करून खोटी माहिती देऊन पोलिसांना त्रास देण्याचे तसेच ११२ चा गैरवापर करत असल्याचे समोर आले. याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाळासाहेब काशिनाथ साकोरे रा. महादेववाडी केंदूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.