हडपसर, (पुणे) : ‘सायकल चालवा आणि इम्युनिटी वाढवा, झाडे लावा झाडे जगवा ‘हा संदेश देत हडपसर जवळ असलेल्या फुरसुंगी (ता. हवेली) येथील 11 तरुणांनी थेट सोळाशे किलोमीटरचा पुणे ते अयोध्या असा सायकल प्रवास सात दिवसात पार करीत विक्रम केला आहे. या तरुणांचा हा सायकलचा प्रवास कौतुकाचा विषय ठरला असून परिसरातून त्यांच्या जिद्दीचे व साहसाचे कौतुक केले जात आहेत. या सात दिवसाच्या प्रवासात त्यांना तीन राज्यातील नागरिकांचे वेगवेगळे मार्गदर्शन मिळाले.
फुरसुंगी ते अयोध्या हे सोळाशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सायकलिंग राईडचे नियोजन फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुप फुरसुंगीच्या वतीने करण्यात आले होते. अमोल वाजे, जीवन पवार, प्रविण भोसले, प्रशांत कामठे, रविंद्र हरपळे, तानाजी अडागळे, गुणवंत गायकवाड, रामदास लावंड, संतोष मसुडगे, किरण कामठे, गोरख कामठे या तरुणांनी 23 नोव्हेंबरला फुरसुंगी गावचे ग्रामदैवत श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सायकलिंग राईडला सुरुवात करून प्रस्थान केले. 29 नोव्हेंबरला सांयकाळी ते अयोध्या या ठिकाणी पोचले. या प्रवासादरम्यान महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश येथील काही लोकांनी केलेले त्यांचे स्वागत त्यांच्यासाठी उर्जा देणारे ठरले.
सायकलिस्ट ग्रुप फुरसुंगी ग्रुपलाआव्हान होते मात्र सगळ्यांनीच एकमेकांना आधार, धीर व साथ देत तयारी दाखविली. रोज आठ ते नऊ तासांचा प्रवास केला. दिवसात कमीत कमी अंतर 225 ते तर जास्त अंतर 250 किलोमीटर पार केले. रस्त्यातील येणारा प्रत्येक चढ हा नंतर उतार दाखविणारा आहे हे मनाला पटवून देत होते. शरीर थकले होते मात्र मन प्रसन्न राहिले. यादरम्यान अनेकांनी जागोजागी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
हे सगळे सायकलवरुन अयोध्या या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी देवस्थानच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस करून दर्शनासाठी वेळ दिली. ही सायकल वारी पाहून अयोध्या येथील सहकारी बँकचे चेअरमन व देवस्थानचे पदाधिकारी धर्मेंद्र प्रताप सिंह व समाजसेविका शशि रावत यांनी सर्व सायकलिस्टचा सन्मान केला. देवस्थानच्या पदाधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप तरुणांच्या पाठीवर मारली या अदभुत प्रसंगाने फुरसुंगीतील तरुणांच्या मनात वेगळाच आनंद मिळाला.
View this post on Instagram
पंढरपूर, तुळजापूर, तिरुपती बालाजी सायकलवर प्रवास
प्रवासापूर्वी न थांबता दीडशे किमी सायकल प्रवास करून सर्वजण सराव करत होते. यापूर्वी या तरुणांनी फुरसुंगी ते पंढरपूर, तुळजापूर, तिरुपती बालाजी, कळसूबाई शिखर असा प्रवास केला आहे.
दरम्यान, गोरख कामठे, जीवन पवार, रवींद्र हरपळे, अमोल वाजे म्हणाले की, “सायकलवरून पूर्ण भारत भ्रमण करण्याचा आमचा मानस आहे” तर प्रवीण भोसले, तानाजी अडागळे, गुणवंत गायकवाड, म्हणाले की, “उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदूषण विरहित वाहनाचा वापर करून पर्यावरण जपणे यासाठी सायकल वापर हा उत्तम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत,”