पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तिवेतन धारकांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आयकराच्या गणनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या गुंतवणूक, बचतीची कागदपत्रे, तसेच पॅनकार्डची सत्यप्रत २० नोव्हेंबर २०२४ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. सेवानिवृत्ती धारकांमध्ये भा.प्र. से., भा.पो.से., भा.प.से. व माजी आमदारांचाही समावेश आहे. नवीन कर प्रणालीनुसार ६० वयापर्यंत तसेच ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास तर जुन्या कर प्रणालीनुसार ५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न आयकर पात्र आहे.
आयकर पात्र उत्पन्न असलेल्या निवृत्तिवेतनधारकांनी आयकर कायदा १९६१ चे कलम ८० सी, ८० सीसीसी, ८० डी, ८० जी या नुसार गुंतवणूक व बचत केली असल्यास त्यासंबंधित कागदपत्रे, सत्यप्रत व पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय येथे प्रत्यक्ष येऊन सादर करावीत. संबंधित तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवृत्ती वेतनातून आयकराची हप्त्यांमध्ये कपात करून घेण्यात येईल, असे जिल्हा कोषागार कार्यालयाचे (निवृत्तिवेतन) सहायक संचालक यांनी सांगितले आहे.