हडपसर, (पुणे) : वैदुवाडी, हडपसर परिसरात खंडणी न दिल्याने धारधार शस्त्राने मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले. कुलदीप सिंग उर्फ जोग्या जुनी व अक्षय उर्फ मॅक्स पुरबिया अशी जामीन झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र हे वैदुवाडी हडपसर परिसरात त्यांचे बॅनर व फ्लेक्स लावायचे काम करत असताना त्या परिसरातील सराईत गुन्हेगार असलेला अक्षयसिंग जुनी व त्याच्यासोबत जोग्या सिंग व मॅक्स पुरबिया असे एकत्र येऊन फिर्यादी याला ‘आमच्या परिसरात बॅनर व फ्लेक्स लावायचे असतील तर आम्हाला दर महिन्याला हफ्ता द्यावा लागेल’, अशी खंडणीची मागणी केली.
फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अक्षय सिंग व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्याच्या साथीदारास मारहाण केली होती. त्यावेळी मॅक्स पुरबिया याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीवर वार करून पळून गेले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसात आरोपींच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न व खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.
दरम्यान, आरोपी कारागृहात असताना त्यांनी अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आरोपी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने यांच्या न्यायालयाने आरोपींना अटी-शर्थीवर जामीन देण्याचा आदेश पारित केला. यासाठी अॅड. मिथिल बुरुंडे, अॅड. स्वप्नील दाभाडे यांनी न्यालयीन कामकाजात मदत केली.