पुणे: प्रसिद्ध उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. पुर्वेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी झाली. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर आहे.
सायरस पुनावाला यांना शुक्रवारी सकाळी रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट काढण्यात आली आहे. या प्रेसनोटमध्ये म्हटलंय की, डॉ. सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य इन्फार्क्ट झाला होता, त्यामुळे त्यांना रुबी हॉल येथे दाखल करण्यात आले होते. 17 नोव्हेंबरला पहाटे डॉ. सायरस पूनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी झाली. ते लवकर बरे होत असून रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पूनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.
उद्योगपती सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहेत. 1966 मध्ये स्थापन झालेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते.