पुणे : पुण्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातून दुचाकी वाहने चोरुन नेत असताना 22 मार्चला पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन चोरट्यांचा मृत्यु झाला आहे. मुंढवा पोलिसांनी वाहन चोरी करणार्या दोन चोरट्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या अपघाताची माहिती समोर आली. या चोरट्यांकडून मुंढवा पोलिसांनी 3 लाख रुपयांच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत.
रामेश्वर अंकुश धनगर (वय 27 वर्ष, रा. पैठण, छत्रपती संभाजीनगर) आणि जलाल हनिफ शेख (वय 23 वर्ष, रा. जोगेश्वरी, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यां नावे आहेत. रामेश्वर धनगर हा सराईत वाहनचोर असून त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, पैठण, बीड येथे वाहनचोरीचे 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अधिक माहिती अशी की, मुंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे शहर व जिल्ह्यातून दुचाकी वाहने चोरी करुन त्यांची विक्री करण्यासाठी दोन जण हडपसर रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली येणार आहेत. माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी यामाहा दुचाकीवरून आलेल्या दोघांना पकडले. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडील दुचाकी ही केशवनगर येथून चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता मुंढवा पोलीस ठाण्यातील चार आणि छत्रपती संभाजीनगरमधील तसेच सातारा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून 3 लाख 9 हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
यावेळी केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी दोन साथीदारांच्या मदतीने चोरी करीत असल्याचे सांगितले. मुंढवा येथील दुचाकी चोरुन अहिल्यानगरला जात असताना त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांचा मृत्यु झाल्याचेही चौकशीअंती समोर आले.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, शिवाजी जाधव,राहुल मोरे,योगेश राऊत,विनोद साळुंके यांनी केली आहे.