बारामती : शहरात एका 13 वर्षीय (Pune Crime) अल्पवयीन मुलीवर (Baramati News) अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 23 वर्षीय तरुणाविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 ते 17 ऑक्टोबर 2025 या काळात बारामती तालुक्यातील पीडितेच्या राहत्या घरात आणि घराशेजारील जागेत हा प्रकार घडला. आरोपीने इंस्टाग्रामवरून पीडित तरुणीशी ओळख करून घेतली. सुरुवातीला तो तिच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत होता. त्यानंतर भेटवस्तू, चॉकलेट्स देऊन आणि गोड बोलून त्याने तिचा विश्वास संपादन केला.

विश्वास जिंकून आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देत ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात गेली. अखेर तिच्या आईने धैर्य दाखवत बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे मंगळवारी, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार खेडकर यांनी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकारी म्हणाले.
या प्रकरणामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या सोशल मीडियावरील संपर्कांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस बळी न पडता संशयास्पद वर्तनाची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर प्रकरणाचे अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.







