नाशिक(Nashik Crime News): नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कानळद येथील आशा वर्करचा तिच्याच सहकारी ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 18 ऑक्टोबरच्या रात्री घडली असून या प्रकरणानंतर आयटक संलग्न आशा वर्कर संघटना आक्रमक झाली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी पीडित आशा वर्कर दिवसभर ड्युटीवर होती. तिने गर्भवती महिलांना देवगाव, निफाड आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दिवसभर काम केले. रात्री ड्युटी संपल्यानंतर त्या रुग्णवाहिकेतूनच घरी परतत असताना सहकारी ॲम्बुलन्स चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले असा आरोप चालकावर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक आरोग्य कर्मचारीवर्गात संतापाची लाट उसळली आहे.

घटनेनंतर आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपी चालकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.







