पुणे: भिगवन ते बारामती (Pune Crime) मार्गावरील मदनवाडी गावच्या (Pune News) हद्दीत देवकाते वस्तीतील ओढ्याच्या पुलाखाली ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेला एका महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी अल्पावधीतच खूनाचा छडा लावत पतीच आरोपी असल्याचे उघड केले आहे.

22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब हनुमंत वनवे (वय 44, रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी ओढ्याच्या पुलाखाली ब्लॅंकेटमध्ये काहीतरी बांधून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, कुजलेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचे अंदाजे वय 30 ते 35 वर्ष असून, तिच्या डोक्याची कवटी फुटलेली होती. हातावर ‘रविराज’ असे गोंदवलेले होते. अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून पुलाखाली टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

तपासासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (पुणे ग्रामीण) यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवन पोलिसांच्या तीन पथकांची स्थापना करण्यात आली. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे अवघड झाले. मात्र, हातावरील गोंदनाचे फोटो काढून ते परिसरातील पोलीस ठाण्यांना व नागरिकांना पाठवण्यात आले.

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे मृतदेह हा दिपाली सुदर्शन जाधव (वय 30, रा. कटफळ, ता. बारामती, जि. पुणे) यांचा असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. तिचे पती सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव (वय 36, रा. कटफळ) यांनी बारामती पोलिसांकडे 14 ऑक्टोबर रोजी पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. हातावरील गोंदन पाहून त्यांनी मृतदेह ओळखला.
चौकशीत सुदर्शन जाधव यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली. दिपाली जाधव ही गर्भवती होती आणि तिचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीला होता. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात सुदर्शन यांनी पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून ज्युपिटर दुचाकीवरून मदनवाडी परिसरातील पुलाखाली फेकून दिला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजीत शिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे, ज्ञानेश्वर शिरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे यांच्यासह भिगवन पोलिस स्टेशनचे अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजीत मुळीक, मयूर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, कविता माने, तसेच पोलीस पाटील शमल पवार यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवन पोलीस ठाणे करत आहे.
“मृतदेहाची ओळख पटवणे हे सुरुवातीला आव्हानात्मक होते. मात्र पथकाने अथक प्रयत्न करून ठोस धागे मिळवले आणि अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात यश आले. या कारवाईत सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय ठेवला. अशा तपासातून पोलिसांवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो.”
— सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे







