Pune Crime| हडपसर, (पुणे) : जामीनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने धावत्या प्रगती एक्स्प्रेसमधून पत्नी आणि २ वर्षाच्या मुलीला ढकलून दिल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू (Pune Crime) झाला आहे. तर तिच्या आईवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आर्या आकाश भोसले (२, रा. पद्मावती, पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर आई वृषाली आकाश भोसले (वय- २२) ही गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी सराईत गुन्हेगार आकाश भोसले याच्याविरूध्द लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याविरूध्द शहरातील वेगवगळया पोलिस ठाण्यात ७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
आईवर ससून रूग्णालयात उपचार सुरू…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश भोसले हा त्याची पत्नी वृषाली आणि मुलगी आर्याला घेऊन रविवारी मुंबईकडे प्रगती एक्स्प्रेसने निघाला होता. हाजी अली दर्ग्यावर त्याला जायचे असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. खडकी रेल्वे स्टेशन परिसरात त्याने पत्नीला दरवाज्याजवळ बोलावले. त्यावेळी वृषालीच्या कडेवर २ वर्षाची आर्या होती. धावत्या रेल्वेमधून आकाशने वृषालीला ढकलून दिले.
सदर घटनेने रेल्वेत प्रवास करणार्या प्रवाशांनी तात्काळ साखळी ओढून रेल्वे थांबविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी वृषाली आणि आर्या यांना तात्काळ ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी दिली.
दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी आकाश भोसले याला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया जगताप करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!