Pune Crime : बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करणाऱ्या (Pune Crime) फुरसुंगी येथील सराईत चोरट्याला फुरसुंगी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2 लाख लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी हा सराईत असून त्याने पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्कर, वानवडी, पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी केल्याची कबुली फुरसुंगी पोलिसांना दिली आहे.

आर्यन अजय माने, (रा. रेल्वे पटरीजवळ, आशिर्वाद पार्क, फुरसुंगी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फुरसुंगी पोलिसांनी तब्बल 61 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे.

फुरसुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतरवाडी येथील व्यावसायिक मयुर अग्रवाल हे त्यांचे कुटूंबियासह घराला कुलूप लावून 24 ऑगस्टला व्यवसायाकरीता स्टॉलवर गेले होते. 25 ऑगस्टला कामकाजामुळे ते त्यांचे घरी न येता सातववाडी, हडपसर येथे थांबले होते. या कालावधीत फिर्यादी घरी नसल्याचे पाहुन अज्ञात चोरटयाने त्यांच्या राहत्या घरात खिडकीतुन प्रवेश केला होता.घरात ठेवलेल्या कपाटातील एकुण 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चांदीची गणपतीची मुर्ती व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हेमंत कामथे व हवालदार नितीन गायकवाड करीत असताना त्यांनी परिसरातील 61 सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, घरफोडी करणेकरीता वापरलेली मोटारसायकल पावर हाऊस, फुरसुंगी परिसरात संशयीतरित्या दिसून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने फुरसुंगी परिसरामध्ये जावून कसुन शोध घेतला असता, रेल्वे पटरीजवळ, गोडावूनचे मागे, संशयीत मोटारसायकल दिसून आली. मोटारसायकलबाबत माहिती घेतली असता ती मोटारसायकल आर्यन माने, हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित इसम आर्यन माने दिसुन येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंघाने तपास केला असता त्याने सदरची घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी माने हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने पुणे शहरातील लष्कर, वानवडी, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात यापुर्वी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच घरफोडीतील चोरी केलेला मुद्देमाल त्याने त्याचा साथीदार जावेद अबुबखर बागवान, रा. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे यास विल्हेवाट लावण्याकरीता दिला असल्याचे तपासामध्ये आढळुन आले. तपासामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोने व आरोपीने चोरी करणेकरीता वापलेली दुचाकी असा 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हात जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकअमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमन, नितीन सोनवणे यांनी केली आहे.







