पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुन्हाडीचा घाव टाकून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी वारजे परिसरात घडली आहे. उमा ऊर्फ पूजा लखन कांबळे (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती लखन कांबळे (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कांबळे दाम्पत्य मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करायचे. लखन गेल्या काही दिवसांपासून काही काम करत नव्हता. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. याच वादातून लखनने उमाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.
या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर लखन कांबळे याने पळ काढला होता. तो परत येत असताना पोलिसांना मिळून आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अमोल सुतार यांच्या पथकाने केली.