पुणे : रोडवर पार्क केलेल्या वाहनांची धारदार हत्यारे व लोखंडी रॉडने तोडफोड करून, ‘आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत’ असे म्हणत परिसरात दहशत माजवल्याची घटना सोमवारी (ता. १३) रात्री सव्वाएक ते दोनच्या सुमारास सत्यम सेरेनिटी सोसायटी, माळवाडी तसेच वडगाव शेरी गावठाण परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चंदननगर पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. याबाबत शरणप्पा करेप्पा यातनूर (वय-५४, रा. महावीर नगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अतिश उमेश डिंगरे (वय-२३, रा. दीपक चौपाटी, यवतमाळ), स्वप्नील गोवर्धन ओव्हाळ (वय-२२, डुक्कर गल्ली, वडगाव शेरी), कुणाल महेंद्र परीहार (वय-२०, रा. गणेश नगर, कलवड वस्ती, लोहगाव), आकाश हरीश्चंद्र पायगुडे (वय-२२) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सत्यम सेरेनिटा सोसायटी येथे रात्रपाळी सिक्युरिटी गार्ड म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी दोन दुचाकीवरुन ट्रीपल शिट येऊन आरडाओरडा करत होते. येथे का आरडाओरडा करता, असे फिर्यादी यांनी विचारले असता, आरोपींनी ‘तुला माहित नाही का, आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत,’ असे म्हणत फिर्यादीच्या केबीन व साईनबोर्ड दगड मारून फोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरोपींचा गोंधळ सुरु असताना सोसायटीमधील लोक बाहेर आले.
या वेळी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी हातातील लोखंडी हत्यार व रॉड हवेत फिरवले. तसेच रोडवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन ९५ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ- ४ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.