पुणे : सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. सायबर चोरट्याने शहरातील दोन जणांची 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी तक्रार केलेले तक्रारदार कर्वेनगरमधील रहिवासी आहेत. चोरट्यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घरून काम मिळेल, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. कामात दिलेले टास्क पुर्ण केल्यास चांगले पैसे मिळतात, असेही सांगितले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला एक काम दिले. काम पूर्ण केल्यानंतर त्याला पैसेही दिले. सुरूवातीला काही रक्कम देखील त्यांना दिली. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसला. नंतर मात्र, त्यांच्याकडून वेळोवेळी 41 लाख 94 हजार रुपये घेतले. पैसे जमा केल्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख करत आहेत.
तसेच दुसरीकडे सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर भागातील एका महिलेस कारवाईची भीती दाखवून 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याघटनेबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे यावेळी चोरट्यांनी सांगितले. तुमच्या बँक खात्यातून ब्लॅक मनीचा व्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे.
त्याकरीत ही कारवाई टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर पैसे भरावे लागणार आहेत, असे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यादरम्यान महिलेने चोरट्यांच्या खात्यात मागील त्यावेळी 15 लाख रुपये जमा केले.
याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी करत आहे