पुणे: स्वारगेट परिसरात (Pune Crime) अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन (Pune News) केल्याप्रकरणी एका शिकवणी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पीडित मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नियमितपणे आरोपीकडे शिकवणीसाठी जात होती. आरोपी स्वारगेट भागात खासगी शिकवणी वर्ग चालवितो. गुरुवारी (9 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 7.45 वाजता वर्गात मुलगी एकटीच असताना आरोपीने तिच्याशी संवाद साधला आणि गैरवर्तन केले.

‘तू शिकवणी वर्गात आल्यापासून मला आवडतेस. मी लवकरच शाळा सुरू करणार असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुला नोकरी देईन. तसेच तुला सोन्याची अंगठीही देईन’, असे सांगून आरोपीने अनुचित कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने ही घटना कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर आणि उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) तसेच विनयभंगाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.







