Pune Crime : भोर : तालुक्यातील संगमनेर हद्दीत जागेच्या वादातून दोन कुटुंबातील महिला सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शुभांगी अक्षय गाढवे (वय २६ रा. संगमनेर ता. भोर) यांनी राजगड नसरापूर पोलीस ठाणे अंकित किकवी पोलिसात मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी शांताराम तुकाराम बांदल, सत्यजित शांताराम बांदल, अभिजीत शांताराम बांदल, सावित्रीबाई शांताराम बांदल, कांचन सत्यजित बांदल, संध्या अभिजीत बांदल (सर्व रा.संगमनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील संगमनेर येथील गट क्र. २६ येथे फिर्यादी शुभांगी गाढवे यांच्या सासऱ्याच्या नावावर पाळीव जनावरांचा गोठा आहे. गोठा आणि परिसरातील जमीन जेसीबी मशीनने साफसफाई करण्यासाठी बांदल कुटुंबियांनी सुरुवात केली. यावेळी अभिजीत बांदल यांनी ‘गोठ्यातील जनावरे बाहेर काढा, गोठा पाडणार आहोत’ असे शुभांगी गाढवे यांना सांगितले. यावेळी तक्रारदार यांनी ‘गोठा सासऱ्यांच्या नावावर आहे. ते इथं नाही ते आल्यावर गोठा पाडा’ अशी विनंती केली. मात्र, बांदल कुटुंबीयांनी जेसीबी मशीनने गोठा पाडणे सुरू केले.
दरम्यान, तक्रारदार महिला पुन्हा एकदा विनंती करण्यास गेली असता त्यांना सावित्रीबाई, कांचन, अभिजीत यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या चुलत सासू सायली गाढवे यांना देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लडकत करत आहेत.