लोणी काळभोर, (पुणे) : गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी 100 पेक्षा अधिक गुन्ह्यात फरार असलेला व सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला बीटी कवडे रोड, वानवडी परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पापासिंग दयालसिंग दुधानी, (वय-50, रा. पेरणे, बिराजदार नगर, गल्ली नं.-5, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दुधानी हा सराईत आरोपी असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली येथील एकुण 12 गुन्हयांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बुधवारी (ता. 30) गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक गस्त घालीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी पापासिंग दुधानी हा बीटी कवडे रोड, वानवडी, पुणे येथे थांबलेला आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणावरून आरोपी नामे पापासिंग दुधानी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली पोलिसांना दिली. पुढील तपासकामी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, अधिक चौकशी केली असता आरोपीवर 100 पेक्षा जास्त घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत. सदरचा आरोपी हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली येथील एकुण 12 गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे. तसेच सदर आरोपीवर यापुर्वी मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधुन तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, पोलीस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, समीर पिलाने, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.