पुणे : विमाननगरमधील सिंबायोसिस महाविद्यालयाच्या हॉस्टेलबाहेर शतपावली करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोघांनी मारहाण करून हॉस्टेलमध्ये घुसत इतर विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी सिंबायोसिस हॉस्टेलचे वॉर्डन राकेश कैलास घरडे (वय ५२, रा. गुरुवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ओमकार सतीश घाडगे (वय १९, रा. जय जवाननगर, येरवडा) आणि रुबेन रिचर्ड कदम (वय २०, रा. साईनाथनगर, चंदननगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सिंबायोसिस कोपोऊ हॉस्टेलसमोरील फुटपाथ आणि हॉस्टेलमध्ये ही घटना घडली.

शतपावली करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलमधील दोन विद्यार्थी जेवण झाल्यानंतर रात्री हॉस्टेलसमोरील फुटपाथवर शतपावली करत होते. त्यावेळी आरोपी दोघे तेथे आले. त्यांनी विद्यार्थ्यांपैकी एकाचा चष्मा काढून घेतला. तसेच तुम्ही इंग्लिशमध्ये काहीतरी शिवीगाळ करता, असे म्हणत दोन्ही विद्यार्थ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून सिमेंटच्या ब्लॉकने आणि हाताने विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले.
हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना धमकी
विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर आरोपी हॉस्टेलमध्येही बेकायदेशीरपणे शिरले. हॉस्टेलच्या आत जाऊन त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे पुढील तपास करत आहेत.







