बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे आणि कार्याचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा विचार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

या प्रेरणास्थानात विविध महापुरुषांची चित्रे लावण्यात येणार असून, त्यासाठी नामवंत कलाकारांकडून चित्रे तयार करून घेण्यात आली आहेत. राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांना येथे प्रेरणास्थान म्हणून स्थान देण्यात येणार आहे.

महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार, कर्तृत्व आणि योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या वास्तूला भेट देणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना संबंधित व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्याची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अहिल्यादेवींच्या कार्याच्या स्मरणार्थ जलसंधारणावर भर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात बारव, विहिरी आणि पाणवठे उभारून जनतेला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून जिरायती भागात बारव उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे. पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये अशा जलसंधारणाच्या उपाययोजना राबवण्याचा विचार असल्याचे पवार यांनी सांगितले.
संदर्भ आणि माहिती अचूक असण्याची गरज
दरम्यान, महिला कार्यकर्त्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती वाचनासाठी देण्यात आली होती. यावेळी माहितीमध्ये झालेली एक चूक शरद पवार यांच्या निदर्शनास आली. महापुरुषांच्या कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवताना संदर्भ आणि ऐतिहासिक तपशील अचूक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१६ ऑक्टोबर रोजी विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त या प्रेरणास्थानाचे उद्घाटन करण्याचा विचार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. महापुरुषांचे विचार आणि समाजासाठीचे त्यांचे योगदान पुढील पिढीला समजावे, या उद्देशाने उभारण्यात येणारे हे प्रेरणास्थान महत्त्वाचे ठरणार आहे.







