अक्षय टेमगिरे

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंधळगाव-न्हावरे हद्दीत असलेल्या टोरेंट CNG कंपनीच्या आवारात 17 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10.00 वाजता बायोगॅस घेऊन आलेल्या एका वाहनातून अचानक गॅस गळती झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही कंपनी बायोगॅस हाताळणी आणि विविध पंपांवर सीएनजी (CNG) पुरवठ्याचे काम करते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, गॅस गळती सुरू असताना कर्मचाऱ्यांकडून तात्काळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना होताना दिसत नसल्याचा आरोप केला जात आहे. गॅस हाताळणाऱ्या ठिकाणी अशा आपत्कालीन स्थितीत गळतीचा स्रोत बंद करणे आणि तात्काळ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असते. परंतु, या व्हिडिओमुळे कंपनीच्या आपत्कालीन सज्जतेवर स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही गळती तांत्रिक बिघाडामुळे झाली की निष्काळजीपणामुळे याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. बायोगॅस आणि सीएनजीसारख्या ज्वालाग्राही पदार्थांची नियमित वाहतूक होत असल्याने येथे लहानशी चूकही मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी प्रशासन, अग्निशमन दल आणि संबंधित सुरक्षा विभागाकडे कंपनीच्या सुरक्षेचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली आहे. बायोगॅस वाहनांची नियमित तपासणी, गॅस गळती रोखणारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रशिक्षण दिले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, गॅस गळतीचे नेमके कारण काय होते, याबाबत टोरेंट सीएनजी कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.







