नागपूर : नागपूरमधील 12 नामांकित खासगी आणि सरकारी शाळांना आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. या शाळांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार विद्यार्थ्यांवर लादल्याचा आरोप ईमेलमध्ये करण्यात आला होता. हे धमकीचे संदेश एका खालिस्तानी संघटनेच्या नावाने पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

धमकी मिळालेल्या प्रमुख संस्थांमध्ये भांडेवाडी येथील सेंटर पॉइंट स्कूलसह अजनी, काटोल रोड आणि वायुसेना नगर भागातील नामांकित शाळांचा समावेश आहे. यासोबतच जिल्हा न्यायालयालाही असाच ईमेल प्राप्त झाला होता. शाळांच्या मुख्याध्यापकांनी सकाळी कॉम्प्युटरवर ईमेल पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती मिळताच सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीने सतर्क राहण्याचे आदेश दिले.बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आधी संपूर्ण शाळा परिसर मोकळा करण्यात आला. तसेच पथकांनी शाळांच्या कोपऱ्या-कोपऱ्याची बारकाईने पाहणी केली. सुदैवाने, या तपासणीत कोणत्याही ठिकाणी संशयास्पद किंवा बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही.

पोलीस गाड्या आणि पथके अचानक शाळेत पोहोचल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बातमी पसरताच पालकांनी मोठ्या संख्येने शाळेकडे धाव घेतली. कोणत्याही प्रकारची घाईगडबड किंवा गोंधळ उडू नये यासाठी पोलीस दलाने सर्व शाळांबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला होता.
ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले असले, तरीही ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सायबर सेलचे पथक वेगाने तपास करत आहे.







