पुणे: पुण्याची वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आता दूरगामी विचार करून करणे गरजेचे आहे. मेट्रो, बससेवा, रिंग रोड, मिसिंग लिंक, पूल आणि रस्ते प्रकल्पांचा एकत्रित विचार करून पुढील ५० वर्षांसाठी सक्षम वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देऊया, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, मेट्रो प्रशासन, स्वयंसेवी संस्था, वाहतूक अभ्यासक आणि विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात आगामी काळात आणखी तीन ते चार हजार बसेस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच बससेवेसाठी आवश्यक रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. मेट्रोचा विस्तार, बससेवेची क्षमता वाढविणे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या विविध साधनांचे एकत्रीकरण याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे हे शिक्षण, उद्योग, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमुळे देशभरातील नागरिकांना आकर्षित करणारे शहर बनले आहे. त्यामुळे शहराचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे नियोजन होणे आवश्यक आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी, पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, डबल पार्किंग आणि हॉकर व्यवस्थापन यांसारख्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी विकेंद्रित स्थानिक वाहतूक समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांमध्ये संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका अधिकारी आणि ४० ते ५० प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असेल. प्रत्येक वाहतूक चौकीच्या कार्यक्षेत्रातील समस्या ओळखून त्यावर स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत.
वाहतूक नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळ आणि सुरक्षा यंत्रणेचा योग्य वापर करण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी बैठकीत पुण्यातील वाहतूक समस्या आणि प्रस्तावित उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार वंदना चव्हाण यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वाहतूक अभ्यासकांनीही सूचना मांडल्या. पुण्याची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस, महापालिका आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.







