पुणे: परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरी आणि महिन्याला दीड लाख रुपये पगार देण्याचे आमिष दाखवत एका २८ वर्षीय महिलेकडून तब्बल ११ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता या महिलेला पोर्तुगालमध्ये नेऊन एका बिअर विक्रेत्याच्या ताब्यात देत तिच्यावर वेश्या व्यवसायासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेने मोठ्या धाडसाने तेथून सुटका करून भारत गाठल्यानंतर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपूरमधील ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी शोधत होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिला इन्स्टाग्रामवर परदेशातील नोकऱ्यांसंदर्भातील जाहिरात दिसली. त्यानंतर तिने संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला आणि तिला पुण्यातील विमाननगर येथील कार्यालयात बोलावण्यात आले. पोर्तुगालसह युरोपमधील विविध देशांमध्ये सुपरमार्केटमध्ये नोकरी, महिन्याला दीड लाख रुपयांचा पगार आणि तीन वर्षांचे वर्क परमिट मिळेल, असे आश्वासन देत तिच्याकडून टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये घेतले.

मे २०२६ मध्ये महिला पोर्तुगालला पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला. दोन दिवस तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर तिला एका गावात आणखी दोन भारतीय महिलांसोबत ठेवून सुपरमार्केटऐवजी बिअर शॉपीमध्ये काम करण्यास सांगण्यात आले.

काही दिवसांनी तिला दुकानाच्या मालकाच्या घरी कामासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी संबंधित एजंटने फोन करून “मालकाला खुश ठेवावे लागेल,” असे सांगितल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही बाब मालकाला समजल्यानंतर त्याने संताप व्यक्त करत, “मी प्रतिमा भाटी आणि तिच्या साथीदारांना पैसे देऊन तुला विकत घेतलं आहे. तुला इथे नोकरीसाठी आणलेलं नाही. मी सांगेल तेच करावं लागेल आणि मला खुश ठेवावं लागेल,” असे धमकीच्या सुरात सांगितल्याचा दावा महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. तिच्यासोबत राहणाऱ्या इतर महिलांनीही मालक सांगेल त्या व्यक्तींसोबत वेश्या व्यवसायासाठी जावे लागते, असे तिला सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर महिलेने पतीशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला आणि पहाटे तेथून पळ काढला. अनेक ठिकाणांहून प्रवास करत ती भारतात परतली. भारतात आल्यानंतरही आणखी तीन लाख रुपयांची मागणी करत पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा यांच्यासह पोर्तुगालमधील काही व्यक्तींविरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.







