पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमासाठी पुण्यात विद्यार्थिनी आणि युवतींची मोठी गर्दी झाली होती. एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी अनेक तरुणींनी तिरंग्याचे टॅटू रंगवले होते, तर काहींच्या हातात तिरंगा, राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि त्यांना पाठिंबा देणारे फलक होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रॉक, हिपहॉप, रॅप आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. बँडच्या तालावर कलाकारांनी केलेल्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, कार्यक्रमावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ‘आरटीओ पुणे’ मेट्रो स्थानकावर मेट्रो थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, महामेट्रोने हा आरोप फेटाळून लावला. शनिवारी पुणे मेट्रोच्या सेवेत कोणताही खंड पडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी ‘आरटीओ पुणे’ स्थानकावर गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रामवाडी ते वनाझ मार्गावर दोन अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या गाड्या स्थानकाजवळील अतिरिक्त मार्गावर उभ्या करण्यात आल्याचे महामेट्रोने सांगितले.

संध्याकाळी साडेसात वाजता पिवळा फुल शर्ट परिधान केलेले राहुल गांधी मंचावर दाखल झाले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘राहुल… राहुल’च्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले. “मी तुम्हाला लेक्चर देण्यासाठी किंवा राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही. तुम्हाला व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी आणि तुमचे विचार जाणून घेण्यासाठी आलो आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी संवादाला सुरुवात केली.
राहुल गांधी यांनी काही विद्यार्थिनी आणि युवतींना मंचावर बोलावून त्यांच्याशी थेट संवाद साधला. महिलांवरील हिंसाचार, असुरक्षितता, शिक्षणातील अडथळे, कौटुंबिक दबाव, रोजगारातील असमानता आणि महिलांच्या मालमत्तेवरील अधिकार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
महिलांना सुरक्षिततेसाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो, अनेक मुली शिक्षण किंवा नोकरी सोडतात, तसेच महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते, असे विविध मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले. घरातील कामाच्या जबाबदाऱ्यांमध्येही मुलींवर अधिक भार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर अनेक वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचे एका तरुणीने सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनीही “मलाही वर्षानुवर्षे शिव्याच दिल्या जात आहेत,” अशी प्रतिक्रिया देत तिच्याशी संवाद साधला.







