पुणे: पुण्यातील वारजे भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेल्याची घटना 7 एप्रिलला घडली. याप्रकरणी सरस्वती विनायक मोरे (वय 80, रा. दिगंबरवाडी शाळेजवळ, वारजेमाळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन आज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला या वारजे येथील दिगंबरवाडी या ठिकाणी कॅनरा बँकेसमोर मोबाईलवर त्यांच्या मुलीशी बोलत उभ्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ति दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. जवळ येऊन त्यांनी महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावली. माळ हिसकावून दोघेही दुचाकीवरून पसार झाले.
याबाबत महिलेने वारजे पोलीस ठाण्यात चोरटयांविरुद्ध तक्रार दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.