पुणे, ता. २९ : कुरकुंभ (ता. दौंड) येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील सुजाता गोरख लोहार (वय ३०) यांच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील विश्वराज हॉस्पिटल, विलो पूनावाला हॉस्पिटल आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळेच त्यांचा जीव गेला, असा गंभीर आरोप करत या तिन्ही रुग्णालयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जनार्दन दांडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे हे प्रत्येक रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य असताना पुण्यातील तीन नामांकित रुग्णालयांनी ही जबाबदारी झटकली. परिणामी एका तरुण विवाहित महिलेचा जीव गेला.

विश्वराजमध्ये पुढील खर्चाचे कारण… पूनावालामध्ये डिपॉझिटची अट… ससूनमध्ये उपचारासाठी साडेचार तासांचा विलंब
२३ जून रोजी कुरकुंभ येथे झालेल्या अपघातात सुजाता लोहार गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना प्रथम दौंड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तेथे आवश्यक उपचार न करता पुढील खर्चाची अट सांगण्यात आली. त्यानंतर त्यांना विलो पूनावाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र ५० हजार रुपयांची डिपॉझिट रक्कम भरल्याशिवाय उपचार सुरू करता येणार नाहीत, असे सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर सुजाता लोहार यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेही जवळपास साडेचार तास उपचार सुरू करण्यात विलंब झाल्याचा आरोप असून, या विलंबामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
धर्मादाय रुग्णालयाचा दर्जा… पण गरीबांसाठी दारे बंद?
तक्रारीत विश्वराज हॉस्पिटलवर आणखी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या दर्शनी भागावर धर्मादाय रुग्णालय असल्याची स्पष्ट माहिती नाही. मोफत उपचार, राखीव खाटा किंवा शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती देणारे फलकही नसल्याने गरीब रुग्णांना त्यांच्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विश्वराज हॉस्पिटलविरोधात यापूर्वीही डिपॉझिटशिवाय उपचार नाकारल्याच्या अनेक तक्रारी आल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
“मोठ्या नेत्याचा फोन आला तरच धर्मादाय योजनेचा लाभ”
धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोठ्या नेत्याचा किंवा प्रभावशाली व्यक्तीचा फोन आल्याशिवाय गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत, असा गंभीर आरोप अनेक रुग्ण व नातेवाईकांकडून होत असल्याचे दांडगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या १० टक्के मोफत आणि १० टक्के सवलतीच्या खाटांचा लाभ प्रत्यक्षात पात्र रुग्णांना मिळतो का? याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सात कलमी मागण्या; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणे, तिन्ही रुग्णालयांतील संबंधित डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका तपासणे, दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधासह सर्व संबंधित फौजदारी गुन्हे दाखल करणे, धर्मादाय रुग्णालयांचे विशेष लेखापरीक्षण करणे, मोफत उपचारांची माहिती सार्वजनिक करणे, डिपॉझिट मागून उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करणे आणि राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची व्यापक चौकशी करण्याच्या सात प्रमुख मागण्या तक्रारीत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, “गरीबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रुग्णालयांना अभय मिळता कामा नये. चौकशी केवळ कागदोपत्री न राहता दोषींवर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहतील,” असेही जनार्दन दांडगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.







