पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात वाढ करण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत अपेक्षित कामगिरी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता प्रत्यक्ष परिणाम दाखवणे गरजेचे आहे. केवळ बैठका किंवा कागदोपत्री नियोजन न करता उत्पन्न वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात भाडेवाढ लागू होऊनही एसटीच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नाही. उलट महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळणाऱ्या या दोन महिन्यांत ३१ पैकी २१ विभाग तोट्यात गेल्याने व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एसटी महामंडळातील आर्थिक अनियमितता आणि अफरातफरीच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. हे पथक विविध आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहे.
याशिवाय प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी संख्या, उत्पन्नवाढ, बस फेऱ्यांचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषांवर अधिकाऱ्यांचे मूल्यांकन केले जाईल.
“चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण पाठबळ दिले जाईल. मात्र अकार्यक्षमता, निष्क्रियता आणि उदासीनता सहन केली जाणार नाही. एक महिन्यानंतर कामगिरीचा आढावा घेऊन आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल,” असा ठाम इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.






