जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावाजवळ एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींसह संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूसवाडीजवळील जंगल परिसरात तिच्या ओळखीच्या काही तरुणांसोबत बसली होती. त्यावेळी तेथे आलेल्या काही तरुणांनी धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी यांनी महिलेवर जबरदस्तीने आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या इतर आरोपींनी महिलेची मदत करण्याऐवजी संपूर्ण प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीत केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अत्याचार करणारे दोन्ही मुख्य आरोपी युसूफ तडवी आणि अशपाक तडवी यांच्यासह आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







