पुणे: पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर या प्रकरणातील सर्व 10 आरोपींना जामीन मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यापूर्वी या प्रकरणातील इतर नऊ आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे समानतेच्या तत्त्वाचा आधार घेत अतुल घटकांबळे यानेही जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

बचाव पक्षाने न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादात घटकांबळे याच्यावर केवळ पैशांची देवाणघेवाण केल्याचा मर्यादित आरोप असून, मुख्य गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच इतर सर्व आरोपी जामिनावर बाहेर असताना केवळ एकाच आरोपीला कोठडीत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्जदाराला समानतेच्या तत्त्वावर जामीन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जामीन मंजूर करताना काही अटी घालण्यात आल्या असून, आरोपीला खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला ट्रायल कोर्टात नियमित हजर राहणे बंधनकारक असणार आहे.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलिसांच्या तपासानुसार, अतुल घटकांबळे हा ससून रुग्णालयाच्या शवगृहात शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर पैशांची देवाणघेवाण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, त्याने मिळालेल्या रकमेतून डॉ. हळनोर यांना 2.5 लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता.







