पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आता अनेक वाहनचालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. रात्रीच्या वेळी या महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहनांवर दगडफेक करून चालकांना गाडी थांबवण्यास भाग पाडले जाते आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून रोकड, दागिने व अन्य मौल्यवान वस्तू लुटल्याच्या घटना समोर येत आहेत.

वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, कळंबोली सर्कल ते खालापूर टोल नाका हा परिसर सध्या सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. अमिटी विद्यापीठ परिसर, भाताण बोगदा आणि कोन गाव एक्झिट या भागांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वाहतूक कमी असताना दरोडेखोर टोळ्या सक्रिय होतात.

या टोळ्या प्रामुख्याने ट्रक, कंटेनर आणि खासगी चारचाकी वाहनांना लक्ष्य करतात. अचानक वाहनावर मोठे दगड फेकल्यामुळे चालक घाबरून वाहन थांबवतो. त्याच क्षणी चार ते सहा जणांचा गट वाहनाजवळ धाव घेत चालकाला मारहाण करतो आणि त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू लुटून पसार होतो. काही प्रकरणांमध्ये चालक गंभीर जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. लूट केल्यानंतर आरोपी सेवा रस्ते किंवा महामार्गालगतच्या झाडीचा आधार घेत पळून जात असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठीही आव्हान ठरत आहे.
अशीच एक घटना शुक्रवारी भाताण बोगद्याजवळ घडली. अर्जुन यादव नावाचे ट्रकचालक पुण्यावरून मुंबईकडे जात असताना त्यांच्या ट्रकवर मोठा दगड फेकण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांनी वाहन थांबवताच काही जण ट्रकमध्ये घुसले आणि त्यांना मारहाण करत पाच हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याची बाळी लुटून घटनास्थळावरून फरार झाले.
या वाढत्या घटनांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढवून दरोडेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.






